(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल गावचे प्रसिद्ध गायक शरद जाधव उर्फ ज्यु. आनंद शिंदे यांना ‘महाराष्ट्र कला भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इमेज इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन अॅन्ड सोशल, बिझनेस सेरेमनी (कोल्हापूर) यांच्या वतीने आयोजित ‘भारत कर्तव्यम् गौरवगाथा कोल्हापूर २०२६’ या राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान पर्वात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी एक वाजता कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्मारक येथे हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे यांच्या शुभहस्ते शरद जाधव यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आपल्या भारदस्त आणि खणखणीत आवाजाने श्रोत्यांच्या मनावर छाप पाडणाऱ्या शरद जाधव यांची विविध गाणी यूट्यूबवर ऐकायला मिळतात. ‘स्वातंत्र्य दिले तुला भीमरायांनी’, ‘भीम कायद्याचे हत्यार’, ‘करावं काय’, ‘भीमाचं वाचून संविधान’, ‘नेत्यांमध्ये कुठे नवं क्रांती दिसतं नाय’ यांसारख्या भीमगीतांसह ‘तुझ्या मोबाईलची रिंगटोन भारी’, ‘पोरीचं रूपं हे गोरं गोरं’, ‘लय झकास दिसतेस पोरी’ आणि ‘कारभारी जोडीने लावूया शेती’ ही त्यांची स्वतःची गाणीही प्रसिद्ध आहेत.
गायन क्षेत्रातील योगदानासोबतच शरद जाधव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या ‘शरद जाधव प्रस्तुत मधुरा’ या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून अनेक होतकरू गायकांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी कला आणि सामाजिक क्षेत्रात मिळवलेले यश प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘महाराष्ट्र कला भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आल्याने पाचलसह राजापूर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


