(रत्नागिरी /प्रतिनिधी)
कोकणातील गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढतो. मात्र यंदा गणेशभक्तांनी नियमांचे काटेकोर पालन केल्याने वाहतूक सुरळीत राहिली. त्यामुळे वायुवेग पथकांना कारवाई करण्याची वेळ आली नाही. तरीदेखील बंदी असताना महामार्गावर धावलेल्या १४ अवजड वाहनांवर कारवाई करून ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई आणि मुंबईसह राज्यातील विविध भागांतून दरवर्षी हजारो गणेशभक्त कोकण व गोव्याकडे प्रस्थान करतात. या वाढलेल्या गर्दीला तोंड देण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाकडून यंदा २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान वाशी (नवी मुंबई) ते कुडाळ (सिंधुदुर्ग) या महामार्गावर वायुवेग पथके तैनात करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे व सहायक प्रादेशिक अधिकारी अजित ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके तीन शिफ्टमध्ये काम करत होती. कशेडी-चिपळूण, चिपळूण-रत्नागिरी आणि रत्नागिरी-राजापूर या तीन टप्प्यांवर ही पथके २४ अधिकारी-कर्मचार्यांसह दिवसरात्र तैनात होती.
गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावर अपघात अथवा वाहन बिघाड झाल्यास तत्काळ मदत करून वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी या पथकांनी पार पाडली. यंदा नियमांचे पालन केल्यामुळे मोठे अडथळे निर्माण झाले नाहीत, मात्र अवजड वाहतूकबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १४ वाहनांवर कारवाई करत ६० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
यंदा गणेशभक्तांनी वाहतूक नियमांचे पालन केल्याने अडचणी आल्या नाहीत. मात्र, अवजड बंदी असूनही वाहतूक करणाऱ्या १४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात सहा वायुवेग पथकांमध्ये २४ अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते.
– राजवर्धन करपे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी

