(मुंबई / क्रीडा)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2026-27 देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी खेळाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. या नव्या नियमांनुसार, जाणूनबुजून फ्रंट-फूट नो-बॉल टाकणाऱ्या गोलंदाजाला संपूर्ण सामन्यासाठी गोलंदाजी करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. याशिवाय, प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दिवसाच्या शेवटच्या षटकासंदर्भातील नियमातही मोठा बदल करण्यात आला आहे. BCCI ने या सुधारित नियमांची माहिती सर्व राज्य क्रिकेट संघटनांना पाठवली असून, हे बदल मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) यांनी सुचवलेल्या सुधारित नियमांवर आधारित आहेत.
जाणूनबुजून नो-बॉल टाकल्यास कठोर कारवाई
नव्या नियमानुसार, एखाद्या गोलंदाजाने जाणीवपूर्वक फ्रंट-फूट नो-बॉल टाकल्याचे पंचांच्या निदर्शनास आल्यास त्याला केवळ त्या डावापुरते नव्हे, तर संपूर्ण सामन्यात गोलंदाजी करण्यास मनाई करण्यात येईल. यापूर्वी अशा प्रकारच्या प्रकरणात संबंधित गोलंदाजाला फक्त त्या डावात गोलंदाजी करण्यास बंदी असायची. मात्र पुढील डावात तो पुन्हा गोलंदाजी करू शकत होता. आता हा नियम अधिक कठोर करण्यात आला आहे.
BCCI ने स्पष्ट केले आहे की, गोलंदाजाने नो-बॉल जाणीवपूर्वक टाकला की नाही, याचा अंतिम निर्णय मैदानावरील पंच घेतील. पंचांच्या निर्णयानुसारच संबंधित गोलंदाजावर कारवाई केली जाईल.
दिवसाच्या शेवटच्या षटकातही मोठा बदल
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दिवसाच्या शेवटच्या षटकाच्या नियमातही सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी, दिवसाच्या अखेरच्या षटकात विकेट पडल्यास दिवसाचा खेळ तत्काळ संपवला जात असे. मात्र आता तसे होणार नाही. नव्या नियमानुसार, शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर विकेट पडल्यास नवीन फलंदाजाला मैदानात येऊन षटकातील शेवटचा चेंडू खेळावा लागेल. म्हणजेच दिवसाचे शेवटचे षटक कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाईल.
MCC च्या शिफारशीनुसार बदल
MCC च्या मते, जुन्या नियमामुळे दिवसाच्या शेवटी नवीन फलंदाजाला क्रीजवर येण्याची संधी मिळत नव्हती. त्यामुळे खेळातील सातत्य आणि नियमांमध्ये अधिक स्पष्टता आणण्यासाठी ही सुधारणा करण्यात आली आहे. या बदलांमुळे विशेषतः गोलंदाज, पंच आणि संघ व्यवस्थापनाला अधिक जबाबदारीने निर्णय घ्यावे लागणार असून, देशांतर्गत क्रिकेटमध्ये नियमांची अंमलबजावणी अधिक कडक होणार आहे.

