(रत्नागिरी)
ग्रामपंचायत वाटद मिरवणे येथे ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या मासिक सभेत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला होता. मात्र तब्बल चार वर्षे उलटूनही या ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही.
आरटीआय कार्यकर्ता व पत्रकार निलेश रहाटे यांनी या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी ऑक्टोबर २०२४ पासून सातत्याने पाठपुरावा केला. जुलै २०२५ मध्ये त्यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर रहाटे यांनी उपोषण स्थगित केले, परंतु आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
या प्रकरणात सरपंच व ग्रामसेवकांकडे विचारणा केली असता एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे प्रकार सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. “ग्रामस्थांना गाजर दाखवायचं आणि प्रत्यक्षात काहीच करायचं नाही, हीच का प्रशासनाची कार्यपद्धती?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ठरावांची अंमलबजावणी बंधनकारक असूनदेखील अधिकारी बेफिकीर असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. ठराव, आश्वासन आणि उपोषण झाल्यावरही एक साधा सीसीटीव्ही कॅमेरा लावता आला नाही, यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, तात्काळ कॅमेरे बसवले नाहीत तर ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच या प्रकरणी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.

