(नवी मुंबई )
ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात गर्भवती सोनम डोंगरे यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशी समितीने संबंधित डॉक्टरांना क्लीन चिट दिली आहे. उपचार प्रक्रियेदरम्यान डॉक्टरांकडून कोणताही निष्काळजीपणा झाल्याचे आढळून आले नसल्याचे समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. अहवाल सोमवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत सादर करण्यात आला.
समितीच्या अहवालानुसार, उपचारादरम्यान सोनम डोंगरे यांना देण्यात आलेल्या एका इंजेक्शनमुळे अत्यंत दुर्मीळ स्वरूपाची औषध प्रतिक्रिया (Allergic Drug Reaction) झाली. त्यानंतर झालेल्या उलटीतील अन्न आणि द्रव फुफ्फुसात गेल्याने (Aspiration) त्यांचा तसेच गर्भातील बाळाचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अशा प्रकारची तीव्र औषध प्रतिक्रिया लाखो रुग्णांपैकी एखाद्यालाच होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही घटना वैद्यकीय निष्काळजीपणामुळे नव्हे, तर दुर्मीळ वैद्यकीय गुंतागुंतीमुळे घडल्याचे समितीने नमूद केले आहे.
अहवालात उपचार संपूर्णपणे वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. चौकशीदरम्यान वैद्यकीय कागदपत्रे, औषधोपचार, तपासणी अहवाल आणि उपचारपद्धतीची सविस्तर छाननी करण्यात आली. याच कालावधीत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी दोन महिलांनाही संबंधित औषध देण्यात आले होते. त्यापैकी एका महिलेला सौम्य, तर दुसऱ्या महिलेला मध्यम स्वरूपाची औषध प्रतिक्रिया झाली होती. मात्र, दोघींवरही तातडीने उपचार करण्यात आल्याने त्यांना सुरक्षित वाचविण्यात यश आल्याचे अहवालात नमूद आहे.
दरम्यान, महापालिकेच्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले की, चौकशी समितीचा अहवाल सादर झाला असला तरी अन्न व औषध प्रशासन (FDA) यांचा तपास अहवाल आणि अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूबाबतचा अंतिम निष्कर्ष अधिक स्पष्ट होईल.
दुसरीकडे, सोनम डोंगरे यांचे पती करण डोंगरे यांनी चौकशी अहवालावर आक्षेप घेतला आहे. समितीने डॉक्टरांचे जबाब नोंदवले, मात्र कुटुंबीयांची बाजू ऐकून घेतली नसल्याने ही चौकशी एकतर्फी झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या प्रकरणात स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी कायम ठेवली आहे. रुग्णालयातील उपचारपद्धती, वैद्यकीय सुविधा आणि संपूर्ण घटनेचा पुनर्तपास व्हावा, अशी मागणीही मनसेकडून करण्यात आली आहे.
त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल समोर आल्यानंतरही या प्रकरणावरील वाद कायम असून, FDAचा अहवाल आणि अंतिम शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

