( पुणे )
पुण्यातील कात्रज परिसरात जुन्या वादातून 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, त्यापैकी तिघांची भर पावसात परिसरातून धिंड काढण्यात आली. आरोपींना पाहताच मृताच्या आईने भररस्त्यात चपलेने मारत तीव्र संताप व्यक्त केला.
मोबाईल दुरुस्तीसाठी गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला
पोलिसांच्या माहितीनुसार, 17 वर्षीय तरुण आपल्या मित्रासोबत मोबाईल दुरुस्त करून घेण्यासाठी कात्रज कट्टा परिसरात गेला होता. त्याचवेळी दोन दुचाकींवरून आलेल्या सात जणांनी त्यांना अडवले. तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. यानंतर डोके, चेहरा आणि हातावर कोयते व इतर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तत्काळ भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
जुन्या वादातून हत्येचा संशय
प्राथमिक तपासात सुमारे तीन महिन्यांपूर्वी मृत तरुणाचा आरोपी आकाश गायकवाड यांच्या बहिणीसोबत वाद झाल्याचे समोर आले आहे. त्याच वादातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
चार आरोपी अटकेत; तिघांची धिंड
घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत चार आरोपींना अटक केली. अटक केलेल्या तिघांची परिसरात भर पावसात धिंड काढून पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईचा संदेश दिला. दरम्यान, पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या नातेवाईकांनी आरोपींना समोर आणण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. याच वेळी मृताच्या आईने आरोपींना चपलेने मारत संताप व्यक्त केला.
या प्रकरणी राज गौतम, प्रथमेश दामगुडे, राजप्पा पाटील, साई बोंडारे, कृष्णा पांजणाळ, आकाश गायकवाड आणि सागर खरात यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी सांगितले की, मृत तरुणावरही यापूर्वी काही गुन्हे दाखल होते. या पार्श्वभूमीवर हत्येमागील नेमके कारण आणि इतर संबंधित बाबींचा तपास सुरू आहे.

