(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील शिरगाव येथे दंगा घालणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या अंमलदारावरच संशयिताने हल्ला केला. या प्रकारात शहर पोलिस ठाण्यातील अंमलदार विजय आंब्रे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमोल अवधूत मयेकर (रा. शिरगाव, मयेकरवाडी) असे पोलिसांवर हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. सोमवारी रात्री अमोल याचा त्याच्या चुलत भावासोबत कौटुंबिक कारणावरून वाद झाला. वादाच्या भरात त्याने सुरा घेऊन चुलत भाऊ समीर मयेकर याला ठार मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या समीरने तत्काळ शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच अंमलदार विजय आंब्रे यांच्यासह पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि अमोल मयेकरला ताब्यात घेतले. मात्र पोलिसांच्या गाडीतून पोलिस ठाण्याकडे आणत असताना अमोल अचानक आक्रमक झाला. गाडीत ठेवलेले हेल्मेट उचलून त्याने आंब्रे यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात त्यांचा जबडा व दात यांना गंभीर दुखापत झाली असून तोंडातून रक्तस्त्राव होत होता.
जखमी अवस्थेत आंब्रे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर अमोल मयेकरविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

