(खेड)
लोटे औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान कोकाकोला कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर बुधवारी दुपारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बेकायदेशीर जमाव करून कंपनीच्या गाड्या अडवल्या गेल्या. तसेच तेथील एका व्यक्तीला “हातपाय तोडून टाकेन” अशी उघड धमकी देण्यात आली. या प्रकरणी संजय बुरटे (रा. असगणी) याच्यासह एकूण 12 जणांविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी विजयकुमार सुरेंद्र बहादूर सिंग (वय 42, रा. दाभिळ, मूळगाव – उत्तरप्रदेश) घरी जेवत असताना संजय बुरटे याने फोन करून, तो कार्यरत असलेल्या कास्ट सोल्यूशन्स ट्रान्सपोर्ट प्रा. लि. या कंपनीच्या गाड्या अडवल्याची माहिती दिली. घटनास्थळी जमाव जमवून गाड्यांची कागदपत्रे तपासून ती परत करण्यात आली.
फिर्यादी तेथे पोहोचताच संजय बुरटे व त्याच्या साथीदारांनी त्यांना शिवीगाळ केली. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने पाठीवर मारहाण केली आणि “पुन्हा इथे आलास तर हातपाय तोडून टाकेन” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

