(खेड / वार्ताहर)
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अल्पवयीन मुला-मुलींसाठी पोलिस विभाग आणि तहसील प्रशासनाच्या माध्यमातून समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम राबविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी, खेडच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस आणि खेड पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांना निवेदन देण्यात आले.
खेड तालुक्यातील एका १४ वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी ३ ऑगस्ट २०२६ रोजी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित आरोपीला त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुला-मुलींमध्ये सुरक्षितता, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, तसेच अशा घटनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नियमित समुपदेशन व जनजागृती उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पोलिस विभाग आणि तहसील प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांच्या माध्यमातून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशनाचे कार्यक्रम आयोजित केल्यास मुला-मुलींमध्ये योग्य-अयोग्य स्पर्श, सुरक्षितता आणि मदत कुठे व कशी घ्यावी याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करता येतील, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली.
यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, तुषार पवार, सुयश उर्फ बॉबी खेडेकर, बाळू वर्मा, प्रथमेश सुर्वे आणि अमित खेडेकर उपस्थित होते.

