(खेड)
खेड शहरातील शिवाजीनगर जाड्यालवाडी परिसरात आज मंगळवारी सायंकाळी भंगार गोदामातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सायंकाळी सुमारे ५.४४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेचा पाण्याचा टँकर तसेच अग्निशमन विभागाचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
भंगार गोदामातील कचऱ्याने पेट घेतल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. आग वाढून आसपासच्या भागाला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. नगरपरिषदेच्या पाण्याच्या टँकरच्या मदतीने आणि अग्निशमन विभागाच्या समन्वयातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
सदर जागेचे मालक श्री. जाड्याल असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीमभाई सहिबोल, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश बामणे, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, स्वराज गांधी, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

