(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल प्राप्त झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून राबविण्यात आलेली व्यापक तपासणी पूर्ण झाली असून संपूर्ण परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळलेली नाहीत. त्यामुळे न्यायालयातील सर्च ऑपरेशन थांबविण्यात आले असून दैनंदिन कामकाज पूर्ववत सुरू करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी स्पष्ट केले.
आज (सोमवारी) न्यायालयाच्या अधिकृत ईमेलवर बॉम्ब ठेवल्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर न्यायालयीन आणि प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली होती. या संदेशाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपासणी मोहीम सुरू केली. दुपारी दोन वाजल्यापासून पोलीस दलासह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) तसेच श्वान पथकाच्या (डॉग स्क्वॉड) मदतीने न्यायालयाच्या मुख्य इमारतीची, आवारातील प्रत्येक कक्षाची आणि संपूर्ण परिसराची कसून झडती घेण्यात आली.
सलग तीन ते चार तास युद्धपातळीवर ही तपासणी सुरू होती. न्यायालयीन इमारतीचा प्रत्येक कानाकोपरा तपासूनही कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आली नाहीत. त्यामुळे अखेर सर्च ऑपरेशन थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तपासणी पूर्ण झाल्याने न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू ठेवण्यास आता कोणतीही अडचण नसल्याचे महामुनी यांनी सांगितले.
दरम्यान, रत्नागिरी न्यायालयापाठोपाठ राजापूर न्यायालयालाही अशाच प्रकारचा बॉम्बच्या धमकीचा ईमेल प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर न्यायालयातही पोलीस पथकाकडून सध्या कसून तपासणी सुरू असल्याची माहिती बी. बी. महामुनी यांनी दिली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व खबरदाऱ्या घेण्यात आल्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


