(खेड /रत्नागिरी)
घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने दोन घरांचे कडी-कुलूप तोडून तब्बल ७ लाख ९८ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना खेड शहरातील भरणे-बाईतवाडी परिसरात घडली. भरदिवसा घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून, खेड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अभय सहदेव देसाई (४९) हे नोकरीच्या निमित्ताने आदित्य रेसिडेन्सी, रोटरी स्कूलजवळ, भरणे-बाईतवाडी येथे राहतात. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१५ ते १.२५ वाजण्याच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या रूम क्रमांक १०१च्या दरवाजाचे कडी-कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्याने देसाई यांच्या घरातील सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. एवढ्यावरच न थांबता शेजारील रूम क्रमांक १०३ मध्ये राहणारे मिलिंद तुकाराम आदावडे यांच्या घराचेही कडी-कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. या दोन्ही घरांतून चोरी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे १.५ तोळे व सहा ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन, दोन सोन्याचे ब्रेसलेट, दोन कानातले रिंग, एक सोन्याचा हार, तीन सोन्याची नाणी, सोन्याचे टॉप, सोन्याची बाळी, सोन्याची नथ, तसेच सुमारे पाव किलो चांदी, चांदीचा कमरबंध आणि १० हजार रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत ७ लाख ९८ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
भरदिवसा इमारतीतील दोन बंद खोल्यांची कडी-कुलपे तोडून चोरट्याने हात साफ केल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. चोरट्याने घरांची पाहणी करून चोरी केली का, या घटनेमागे पूर्वनियोजन होते का, तसेच इमारतीतील हालचालींची त्याला माहिती होती का, या दिशेनेही तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता, २०२३ मधील कलम ३३१(३) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.


