(सिंधुदुर्ग)
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) सिंधुदुर्ग पथकाने गुरुवारी मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ तालुक्यातील झाराप झिरो पॉइंट येथे सापळा रचून दोन कारमधून अवैधरीत्या वाहतूक केली जात असलेली गोवा बनावटीची दारू जप्त केली. या कारवाईत एकूण ₹10 लाख 92 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एलसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातून दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने झाराप येथे सापळा रचला.
११ सप्टेंबर रोजी पहाटे वाजता गोव्याहून कुडाळच्या दिशेने येणाऱ्या आय-10 आणि स्विफ्ट या दोन संशयित कार थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दोन्ही वाहनांत ₹2 लाख 92 हजार 800 रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली. कारसह एकूण ₹10.92 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई करताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पो. हवालदार प्रकाश कदम, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, कॉन्स्टेबल महेश्वर समजीसकर आदींचा सहभाग होता. पुढील तपास कुडाळ पोलिसांकडून सुरू आहे.

