(तरवळ / अमित जाधव)
राज्यातील पाणीटंचाईची संभाव्य तीव्रता लक्षात घेऊन पाण्याचे संवर्धन करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील तरवळ जाधववाडी येथील ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेतला आहे. ग्रामस्थांनी १ नोव्हेंबर रोजी तरवळ येथील नदीवर एक दिवस श्रमदान करून वनराई बंधारा बांधला.
यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यातील पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर बनली आहे. सार्वजनिक पाणवठे, विहिरी आणि नद्यांनी आतापासूनच तळ गाठल्याने त्याचा परिणाम ग्रामीण भागात जाणवू लागला आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन तरवळ जाधववाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत पाणीसाठा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा बंधारा उभारला. या उपक्रमामुळे माणसांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती रत्नागिरी यांच्या माध्यमातून तसेच ग्रुप ग्रामपंचायत तरवळ आगवे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये वाडीतील महिला आणि पुरुष ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दिवसभर श्रमदान केले.
या वनराई बंधाऱ्याच्या उभारणीसाठी जयेश जाधव, प्रदीप जाधव, संतोष जाधव, प्रभाकर जाधव, विश्वास जाधव, अनंत जाधव, यशवंत जाधव, विठ्ठल जाधव, सुधाकर जाधव, राजकुमार जाधव, सागर जाधव, निशांत जाधव, अभिजित जाधव, अजित जाधव, प्रतिभा जाधव, कल्याणी जाधव आणि उज्ज्वला जाधव यांनी श्रमदान केले. ग्रामस्थांनी एकत्र येऊन राबविलेल्या या उपक्रमातून जलसंधारणाबरोबरच सामूहिक श्रमदानाचा आदर्श निर्माण केला आहे.


