(रत्नागिरी / प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील आरोपी चरण चंद्रमणी कांबळे (वय ४२) याला रत्नागिरी येथील विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय १२ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या खटल्यात विशेष सरकारी अभियोक्ता मेघना सुहास नलावडे यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली.
या प्रकरणातील घटना २०२३ मध्ये घडली होती. आरोपी २०२० मध्ये व्यायामशाळेत प्रशिक्षक म्हणून काम करीत असताना व्यायामासाठी येणाऱ्या पीडित मुलीची त्याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा आणि पीडितेच्या अल्पवयीन वयाचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याशी जवळीक वाढवली. त्यानंतर पीडिता महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आरोपीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करून आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७६ (२) (J), ३७६ (२) (N) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६, ९ आणि १० अन्वये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता मेघना नलावडे यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. त्यांनी सादर केलेले पुरावे आणि प्रभावी युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरले. विशेष म्हणजे, आरोपीने स्वतःच्या बचावासाठी शपथेवर साक्ष नोंदवली होती. मात्र, सरकारी पक्षातर्फे घेण्यात आलेल्या उलटतपासणीत त्याच्या बचावातील मुद्दे खोडून काढण्यात आले. उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली. न्यायालयाने भारतीय दंड विधान कलम ३७६ (२) (J) अन्वये १० वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड, तर कलम ३७६ (२) (N) अन्वये १० वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ६ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड, तर कलम १० अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येक कलमासाठी दोन महिने अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असल्याने आरोपीला प्रत्यक्षात २० वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनुराधा मेहेर यांनी केला. न्यायालयीन कामकाजात पोलीस पैरवी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल मोहिते आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित पडेलकर यांनी काम पाहिले. तसेच जिल्हा पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने सुनावलेली ही कठोर शिक्षा बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.


