(संगमेश्वर / एजाज पटेल)
जंगलातील चपळ आणि प्रभावी शिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मादी बिबट्याचा विषारी सापाच्या दंशाने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोळवली ते तुरळदरम्यान मध्यरात्री मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू सुरुवातीला अज्ञात वाहनाच्या धडकेने झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे खरे कारण सर्पदंश असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
१ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास गोळवली ते तुरळदरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी एक मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आली. रात्रीच्या वेळी महामार्गावर बिबट्या पडलेला दिसताच एका प्रवाशाने तत्काळ वन विभागाला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत बिबट्याचा मृत्यू झाला होता. वन कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी साडवली येथे हलवले.
महामार्गाच्या मध्यभागी बिबट्याचा मृतदेह आढळल्याने अज्ञात वाहनाची धडक बसून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदनादरम्यान ही शक्यता चुकीची ठरली. साखरपा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत बिबट्याच्या शरीरावर वाहनाच्या धडकेमुळे होणाऱ्या ठळक जखमा आढळून आल्या नाहीत. तसेच शरीरातील अंतर्गत अवयवही सुस्थितीत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. अखेर शवविच्छेदन अहवालात विषारी सर्पदंशामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
महामार्गावर मृतावस्थेत आढळल्यामुळे वाहनाच्या धडकेचा संशय व्यक्त होत असताना शवविच्छेदन अहवालाने या घटनेचे वेगळेच वास्तव समोर आणले. जंगलात भक्ष्याचा शोध घेत फिरणाऱ्या या मादी बिबट्याचा अखेर विषारी सापाच्या दंशाने अंत झाला.
बिबट्या हा जंगलातील अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असून, त्याची चपळाई, शिकार करण्याची क्षमता आणि ताकद यामुळे तो प्रभावी शिकारी मानला जातो. मात्र, निसर्गाच्या जीवनचक्रात कोणताही जीव पूर्णपणे सुरक्षित नसतो, याची प्रचिती या घटनेतून आली आहे. इतर प्राण्यांची शिकार करणाऱ्या बिबट्यालाच विषारी सापाच्या दंशामुळे जीव गमवावा लागल्याने ही घटना वन्यजीवांच्या जीवनातील अनिश्चिततेची जाणीव करून देणारी ठरली आहे.


