(नवी दिल्ली)
देशातील कामगारांना सन्मान, सुरक्षितता आणि आधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारनं शुक्रवार पासून चार नवीन कामगार संहिता लागू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या संहितांच्या अंमलबजावणीमुळे सध्याच्या २९ कामगार कायद्यांमध्ये व्यापक बदल करण्यात आले आहेत, तसेच कामगार कायदे अधिक आधुनिक, स्पष्ट आणि जागतिक मानकांना अनुरूप बनवले जात आहेत.
चार संहितांचा समावेश
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या संहितांमध्ये खालील कायदे समाविष्ट आहेत—
- वेतन संहिता, २०१९
- औद्योगिक संबंध संहिता, २०२०
- सामाजिक सुरक्षा संहिता, २०२०
- व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती संहिता, २०२०
मंत्रालयानुसार, देशातील बहुतांश कामगार कायदे स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरच्या प्रारंभीच्या काळात (१९३०–१९५०) बनवले गेले होते. आर्थिक स्वरूप, उद्योगव्यवस्था आणि कामाची पद्धत पूर्णपणे बदललेली असल्याने हे कायदे कालबाह्य ठरत होते. त्यामुळे कामगार आणि उद्योग दोघांच्याही हितासाठी मोठ्या सुधारणांची आवश्यकता होती.
मंत्रालयाने स्पष्ट केले की या संहितांमुळे देशाचे मनुष्यबळ अधिक सक्षम, उत्पादक आणि जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यास तयार होईल. आधुनिक उद्योग रचनेशी सुसंगत, लवचिक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा हा दूरदर्शी प्रयत्न असल्याचे केंद्र सरकारने म्हटले.
कामगारांसाठी मोठी हमी : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया
केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी एक्सवर माहिती देताना सांगितले—
- कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी
- तरुणांना नियुक्तीपत्र देण्याची सक्ती
- महिलांना समान वेतन व सुरक्षिततेची हमी
- ४० कोटी कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा
- एक वर्षाच्या सेवेनंतर निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचे संरक्षण
- ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी
- जास्तीचे काम केल्यास दुप्पट वेतनाची हमी
- अतिजोखमीच्या क्षेत्रातील कामगारांना १००% आरोग्य सुरक्षा कवच
- आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सामाजिक न्यायाची हमी
त्यांनी म्हटले की, या सुधारणा पीएम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कामगारकल्याणासाठी उचललेले ऐतिहासिक पाऊल असून आत्मनिर्भर भारताकडे आणि २०४७ पर्यंत विकसित भारताच्या ध्येयाकडे जाणाऱ्या प्रवासाला नवी गती देणाऱ्या आहेत.
पंतप्रधान मोदींनीही एक्सवर पोस्ट करत चार कामगार संहिता लागू होणे हे “स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात व्यापक आणि प्रगतीशील कामगार-केंद्रित सुधारणांपैकी एक” असल्याचे म्हटले आहे.
नवीन कामगार संहितांतील प्रमुख सुधारणा
१) ठराविक मुदतीच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामगारांसारखे फायदे; निश्चित मुदतीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरूपी कामगारांप्रमाणेच सर्व सुविधा मिळतील. यात रजा, वैद्यकीय लाभ आणि सामाजिक सुरक्षा यांचा समावेश आहे. पाच वर्षांच्या ऐवजी केवळ एका वर्षानंतरच ग्रॅच्युइटीची पात्रता मिळणार आहे.
२) गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी प्रथमच कायदेशीर मान्यता; गिग वर्क, प्लॅटफॉर्म वर्क आणि अॅग्रीगेटर्स यांच्या स्पष्ट व्याख्या कायद्यांतर्गत प्रथमच समाविष्ट झाल्या. अॅग्रीगेटर्सना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या १–२% इतके योगदान द्यावे लागेल. हे योगदान गिग किंवा प्लॅटफॉर्म कामगारांना देय रकमेच्या जास्तीत जास्त ५% मर्यादेत असेल. आधार-लिंक्ड युनिव्हर्सल अकाउंट नंबरमुळे संबंधित सर्व कल्याणकारी लाभ सहज उपलब्ध होतील.
३) महिलांच्या हक्कांचे बळकटीकरण; लिंगभेदाला कायदेशीररित्या बंदी घालण्यात आली आहे. महिलांना पुरुषांप्रमाणेच समान वेतन मिळण्याची हमी. महिलांना रात्रीच्या शिफ्टसह सर्व प्रकारच्या कामात (भूमिगत खाणकाम, अवजड यंत्रसामग्री) काम करण्याची परवानगी; मात्र त्यांची संमती आणि सुरक्षा उपाय अनिवार्य. तक्रार निवारण समित्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व बंधनकारक असेल.
४) सर्व कामगारांना किमान वेतन आणि नियुक्तीपत्राची हमी: देशातील सर्व कामगारांना किमान वेतन मिळण्याची हमी. प्रत्येक कामगाराला नियुक्तीपत्र देणे अनिवार्य. रजा घेतल्यावर वेतन देणे बंधनकारक. कामगारांना केंद्र सरकारने ठरवलेल्या किमान वेतनानुसारच वेतन देणे बंधनकारक राहील.
५) एमएसएमई क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा: सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० अंतर्गत सर्व एमएसएमई कामगारांना कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार लाभ मिळतील. कामगारांसाठी कँटीन, पिण्याचे पाणी, विश्रांतीगृहे अशा आवश्यक सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक.
६) डिजिटल, मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना संरक्षण: इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार, डबिंग कलाकार, स्टंट कलाकार, तसेच इतर डिजिटल आणि ऑडिओ-व्हिज्युअल क्षेत्रातील कामगारांना आता पूर्ण कायदेशीर लाभ मिळतील. सर्व कामगारांसाठी नियुक्तीपत्र अनिवार्य असून त्यात पदनाम, वेतन आणि सामाजिक सुरक्षा हक्क स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असेल.

