(मुंबई)
राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी 8 आणि 9 जुलै रोजी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. प्रलंबित अनुदान आणि लाभांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये या दिवशी शाळा बंद राहणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
शिक्षण विभागाची स्पष्ट भूमिका: शाळा सुरूच राहणार
या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा आदेश जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केलं की, “8 जुलै मंगळवार आणि 9 जुलै बुधवार रोजी राज्यातील सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील.” यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी कोणतीही संभ्रमावस्था न ठेवता शाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षकांच्या संपाचं हत्यार उगारलं गेलं असलं, तरी शाळा बंद न ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
आझाद मैदानावर एल्गार
राज्यातील हजारो शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र येत आपल्या मागण्या मांडणार आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन अधिक ठळक होण्याची शक्यता आहे. आंदोलनामागे प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
-
वाढीव आर्थिक अनुदानाची अंमलबजावणी
-
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा-नियमांचे समाधान
-
प्रलंबित लाभांची तातडीने पूर्तता
मागण्यांची कालक्रमानुसार पार्श्वभूमी:
-
1 ऑगस्ट 2024: अनुदान वाढीच्या मागणीसाठी 75 दिवसांचं राज्यव्यापी आंदोलन
-
14 ऑक्टोबर 2024: शासन निर्णय (जीआर) जाहीर, परंतु निधी वितरणात अपयश
-
10 ऑक्टोबर 2024: मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत अनुदान हप्ता जाहीर करण्याचं आश्वासन
-
जुलै 2025: मागण्या पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा संपाचा इशारा

