( मुंबई )
पश्चिम आशिया आणि आखाती देशांमध्ये सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद संपूर्ण जगात उमटत असून, हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह यूएईमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय प्रवासी अडकून पडले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेतला.
या संकटात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आणि मंगळवारी एकूण 164 नागरिकांना सुखरुप भारतात आणण्यात यश आलं. फुजैरा विमानतळावरून Star Airच्या VT-GSO आणि VT-GSH या दोन विमानांनी काही मिनिटांच्या अंतराने उड्डाण केलं. मंगळवारी रात्री सुमारे 10 वाजता ही विमानं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दाखल झाली.
प्रवाशांचे थरारक अनुभव
मुंबईत सुखरुप पोहोचलेल्या प्रवाशांनी प्रशासनाचे आभार मानले. अनेकांनी युद्धजन्य वातावरणातील अंगावर काटा आणणारे अनुभव सांगितले. एका प्रवाशाने सांगितले की, तो मुंबईहून अमेरिकेला जात असताना दुबईत त्याची कनेक्टिंग फ्लाइट होती. विमान बराच वेळ रनवेवर टेकऑफच्या प्रतीक्षेत थांबलं. तांत्रिक कारणं सांगितल्यानंतर काही वेळातच सर्व उड्डाणं रद्द झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर प्रवाशांना विमानतळावरून हॉटेलमध्ये हलवण्यात आलं. मात्र संपूर्ण दुबईत भीतीचं वातावरण होतं. अनेकांना वेळेवर खोल्या मिळाल्या नाहीत. काहींना हॉटेलच्या लॉबीमध्येच रात्र काढावी लागली. खिडक्यांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अजूनही अनेक भारतीय तिथे अडकले असल्याचं प्रवाशांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांसह विविध जिल्ह्यांतील नागरिकांची सुटका
या विशेष विमानांमधून पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजचे 84 विद्यार्थी, तसेच ठाणे, मुरबाड, अहिल्यानगरसह राज्यातील विविध भागांतील नागरिक परतले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रवाशांशी थेट फोनवर संवाद साधत, “तुम्ही सुरक्षित आहात. महाराष्ट्र शासन आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी आहोत,” असा शब्द दिला होता. संबंधित यंत्रणांशी सतत संपर्क ठेवत त्यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवला.
विमानतळावर स्वागत आणि पुढील व्यवस्था
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकारी विमानतळावर उपस्थित होते. परतलेल्या नागरिकांचे फुलांनी स्वागत करण्यात आलं. अनेक प्रवाशांनी बाहेर पडताच “गणपती बाप्पा मोरया” आणि एकनाथ शिंदेंच्या जयघोषात कृतज्ञता व्यक्त केली. मुंबई विमानतळावरून त्यांच्या गावापर्यंत पोहोचण्याची व्यवस्थाही करण्यात आली, अशी माहिती आमदारांनी दिली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातूनही अडकलेल्या नागरिकांसाठी मदतकार्य सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने विशेष व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला असून, आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांनी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस स्वतः केंद्र सरकार आणि विविध यंत्रणांशी सातत्याने संपर्कात आहेत.
आखाती देशांतील स्थिती
अहवालांनुसार पश्चिम आशियात तणाव शिगेला पोहोचला असून, याचा थेट परिणाम हवाई वाहतुकीवर झाला आहे. अनेक देशांनी आखाती मार्गावरील उड्डाणं थांबवली आहेत. त्यामुळे पर्यटन, रोजगार आणि शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय नागरिक दुबईसह यूएईमध्ये अडकले होते. अशा कठीण काळात महाराष्ट्र सरकारकडून सुरू असलेली ही मदतकार्य नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

