( नाशिक )
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर येथे भाविकाला सुरक्षारक्षकांकडून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना 1 मार्च रोजी सकाळी घडली होती, यामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
गर्भगृहाजवळ वाद, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक भाविक दर्शनासाठी गर्भगृहाजवळ आला असता त्याचा नियुक्त सुरक्षारक्षकाशी वाद झाला. सुरक्षारक्षकाने भाविकाला ढकलल्याने बाचाबाची झाली. काही क्षणातच अन्य सुरक्षारक्षकांनी एकत्र येत त्या भाविकाला ढकलत मंदिराबाहेर काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेनंतर देवस्थानातील सुरक्षारक्षकांच्या गैरवर्तनाबाबत भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात येत असून, देवस्थान ट्रस्ट वारंवार सुरक्षारक्षकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही केला जात आहे.
पोलिसांत तक्रार, सुरक्षारक्षकांवर गुन्हा
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस शिपाई अमोल बोराडे यांनी तक्रार दिल्यानंतर सुरक्षारक्षक पप्पू आचारी, तुकाराम बारुंगे (रा. त्र्यंबकेश्वर) आणि इतर तीन ते चार जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी दिली.
भाविक नशेत असल्याचा दावा
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले यांनी सांगितले की, संबंधित भाविक नशेत असल्याचे त्याच्या वागणुकीवरून दिसत होते. तो बराच वेळ रांगेत बसून होता आणि सोवळं नसतानाही गर्भगृहात जाण्याचा आग्रह धरत होता. नकार दिल्यानंतर त्याने शिवीगाळ करत सुरक्षारक्षकावर हात उचलला आणि देवस्थान कर्मचाऱ्याला दुखापत झाली. नंतर पोलिसांना बोलावण्यात आलं असून भाविकाने आपली चूक मान्य करत माफी मागितल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत आयुष प्रसाद यांनी संपूर्ण प्रकरणाची न्यायदंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांना अनेकदा पाच ते सहा तास रांगेत उभं राहावं लागतं. वेळ संपल्यानंतर हजारो भाविकांना दर्शन न घेता परत जावं लागत असल्याने तणावाचं वातावरण निर्माण होत असल्याचंही यावेळी समोर आलं आहे.
मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
या घटनेवर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, “भाविकाला चार-पाच जणांनी मिळून मारहाण करणं योग्य नाही. कपडे फाडण्यापर्यंत प्रकार गेला, हे गंभीर आहे. परराज्यातून, परदेशातून भाविक येतात. तो नशेत होता की नाही, हे ठरवण्याचा अधिकार मंदिर प्रशासनाला नाही. अशा घटना वारंवार घडणं चुकीचं आहे. दोषींना योग्य धडा शिकवावा लागेल.”
या घटनेनंतर भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, त्र्यंबकेश्वर देवस्थानातील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. चौकशी अहवालानंतर पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

