(पुणे)
पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसर मंगळवारी दुपारी एका नामांकित व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचं भरदिवसा अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. मात्र, पोलिसांची तत्पर कारवाई आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे काही तासांतच युवकाची सुखरूप सुटका करण्यात यश आलं.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी कापूरहोळ येथून एमएच 12 एक्सई 5353 क्रमांकाच्या कारमधून युवकाचं अपहरण करण्यात आलं. प्रकाराची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फतही मदतीचा संदेश देण्यात आला.
माहिती मिळताच जेजुरी पोलीस स्टेशनच्या पथकाने निरा पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेऊर–निरा मार्गावर नाकाबंदी उभारली. संशयित वाहनाचा शोध सुरू असतानाच जेऊरकडून पिसुर्टीकडे जाणारी संशयित कार पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न करताच चालकाने वेग वाढवला. मात्र अरुंद रस्ता आणि वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट उसाच्या शेतात जाऊन अडकली. यानंतर अपहरणकर्त्यांनी ऊसाच्या पिकाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी तात्काळ कारजवळ धाव घेत युवकाला बाहेर काढत सुरक्षित सुटका केली. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं असून तो पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या अपहरणामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आर्थिक वाद, खंडणी किंवा वैयक्तिक वैर अशा सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि वाहनाच्या तपासातून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या धाडसी कारवाईमुळे कापूरहोळ परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला, तरी फरार आरोपींच्या अटकेकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

