(ठाणे)
ठाणे येथे हिंदी टीव्ही मालिका आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या नवख्या तरुणींना पैशांचे आमिष दाखवून सेक्स रॅकेटमध्ये अडकवणाऱ्या 27 वर्षीय अभिनेत्रीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. या कारवाईत दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून, त्यांना महिला गृहात पाठवण्यात आले आहे.
हिंदी मालिकांमधील आणि मॉडेलिंगमधील ज्युनिअर कलाकारांना अधिक मानधनाचे आमिष दाखवून देहव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक पोलिस आयुक्त रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली गोरडे, उपनिरीक्षक स्रेहल शिंदे आणि हवालदार व्ही. आर. पाटील यांच्या पथकाने 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.35 वाजता मासुंदा तलाव परिसरात सापळा रचत संबंधित अभिनेत्रीला अटक केली.
30 हजारांचा सौदा, वर्षभर रॅकेट सुरू
पोलिसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहकाकडून आरोपी अभिनेत्रीने 30 हजार रुपये स्वीकारल्याचे तपासात उघड झाले. यामध्ये 20 हजार रुपये स्वतःकडे ठेवून 10 हजार रुपये पीडित तरुणीला देण्याचे ठरले होते. मागील एक वर्षापासून ती सेक्स रॅकेट चालवत असल्याची कबुलीही तिने पोलिसांना दिली आहे.
स्वतः अभिनेत्री, ओळखीच्या तरुणींनाही प्रवृत्त
ती स्वतः काही हिंदी मालिकांमध्ये कलाकार म्हणून काम करत असून, मॉडेलिंग आणि यूट्यूब चॅनलवर काम करणाऱ्या तिच्या ओळखीच्या महिला आणि तरुणींनाही देहव्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. ठाणे शहरात सुरू असलेल्या मानवी तस्करीविरोधातील कारवायांमध्ये ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

