( मुंबई )
सेरेब्रल पाल्सी हा आजार जितका बालकांसाठी आव्हानात्मक असतो, तितकाच कठीण प्रवास त्यांच्या पालकांसाठीही असतो. आपल्या बाळाला साध्या हालचालींसाठीही झगडताना पाहणं, ही वेदना शब्दांत मांडता येत नाही. याच वेदना समजून घेत ब्रेन स्ट्रोक, सेरेब्रल पाल्सी तसेच अपघातात मेंदूला इजा झालेल्या रुग्णांसाठी नव्या आशेचा मार्ग खुला करणाऱ्या आहेत डॉ. राजुल वासा.
‘वासा कॉन्सेप्ट’ या अभिनव उपचार पद्धतीद्वारे डॉ. राजुल वासा यांनी शेकडो रुग्णांना पुन्हा चालणं, बोलणं आणि स्वावलंबी जीवनाकडे नेण्याचं काम केलं आहे. मेंदूच्या आजारानंतर रुग्णांच्या हालचाली आणि शरीरावरील नियंत्रण सुधारण्यावर ही पद्धत प्रभावी ठरत असल्याचं त्या सांगतात.
डॉ. राजुल वासा यांनी मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल येथून फिजिओथेरपीचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे स्वित्झर्लंडमध्ये न्यूरो-रिहॅबिलिटेशनमधील उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्या सध्या फ्रान्समधील University of Lorraine येथे संशोधन विभागात असोसिएट मेंबर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी Banaras Hindu University सह देशातील विविध संस्थांमध्ये व्याख्यानंही दिली आहेत.
डॉ. वासा सांगतात की, मेंदूच्या आजारावर ठोस औषध नसतानाही ‘वासा कॉन्सेप्ट’मुळे रुग्णांच्या हालचालींमध्ये सुमारे ५० टक्क्यांपर्यंत सकारात्मक बदल दिसून येतो. या संकल्पनेवर परदेशातील विद्यापीठांमध्ये संशोधनही झालं असून जगभरातील अनेक डॉक्टरांनी ही पद्धत स्वीकारली आहे. विशेष म्हणजे, या उपचार पद्धतीचं प्रशिक्षण घेण्यासाठी परदेशातील डॉक्टर भारतात येत असल्याचंही त्या अभिमानाने सांगतात. त्यांच्या सामाजिक आणि वैद्यकीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासन यांनी डॉ. राजुल वासा यांना ‘दिव्यांग प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मानित केलं आहे.
सध्या नाशिकमध्ये ‘वासा कॉन्सेप्ट’ सेंटर कार्यरत असून, भविष्यात भारतातील शक्य तितक्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही केंद्रं सुरू करण्याचा मानस डॉ. वासा यांनी व्यक्त केला आहे. सेरेब्रल पाल्सीग्रस्त रुग्णांना मोफत उपचार देणं, हेच आपलं अंतिम ध्येय असल्याचं त्या सांगतात.
सेरेब्रल पाल्सी, ब्रेन स्ट्रोक किंवा अपघातानंतर मेंदूला इजा झालेल्या रुग्णांसाठी ‘वासा कॉन्सेप्ट’ ही केवळ उपचार पद्धत नसून, नव्या आयुष्याची उमेद ठरत आहे.

