(मुंबई)
प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि भावी पिढ्यांच्या आरोग्यरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेल्या धोरणानुसार आता राज्यातील प्रत्येक वाहनाकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) असणे अनिवार्य असेल. जर PUC वैध नसेल, तर संबंधित वाहनाला पेट्रोल पंपावर इंधन दिले जाणार नाही. हा निर्णय परिवहन आयुक्तालयात १० सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून, राज्यभरात याची कडक अंमलबजावणी होणार आहे.
काय आहेत नवे नियम?
- पेट्रोल पंपांवर स्कॅनिंग : प्रत्येक पंपावर सीसीटीव्हीद्वारे वाहन क्रमांक स्कॅन करून PUCची तात्काळ पडताळणी केली जाईल.
- PUC नसेल तर इंधन नाही : वाहनाकडे वैध प्रमाणपत्र नसेल तर इंधन देणे थेट नाकारले जाईल.
- तात्काळ PUC सुविधा : वाहनचालकांच्या गैरसोयी टाळण्यासाठी पंपावरच PUC काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- युनिक आयडी नंबर : प्रत्येक PUCला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UID) देण्यात येईल, ज्यामुळे त्याची वैधता सहज तपासता येईल आणि बनावट प्रमाणपत्रांना आळा बसेल.
- धडक मोहीम : अवैध मार्गाने PUC तयार करणाऱ्यांविरुद्ध परिवहन विभाग धडक कारवाई करणार असून बनावट प्रमाणपत्रांच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्याचा निर्धार आहे.
पर्यावरणपूरक पाऊल
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले, “भविष्यातील पिढ्यांना प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी आजच्या पिढीने काही निर्बंध स्वीकारणे आवश्यक आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी वैध PUC अनिवार्य आहे. या निर्णयामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच कायदा आणि सुव्यवस्थाही बळकट होईल.”

