(नाशिक)
राज्यभर गाजत असलेल्या मालेगाव शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. नाशिकचे जिल्हा परिषद शिक्षण उपसंचालक प्रवीण पाटील, उपशिक्षण अधिकारी उदय देवरे आणि कार्यालयीन अधीक्षक सुधीर पगार यांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या तिन्ही अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर केले असता १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधी शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी एका शिक्षण संस्थेच्या चालकासह तिघांना अटक करण्यात आली होती. आता दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे वरिष्ठ अधिकारी आरोपी असल्याचे समोर आले आहे.
शिक्षक भरती घोटाळ्याची पार्श्वभूमी
शिक्षण विभागातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. या माध्यमातून बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षकांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे वेतन अदा करण्यात आले. परिणामी शासनाला प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागला.
राज्यपातळीवर एसआयटी गठित
या घोटाळ्याचा सखोल तपास करण्यासाठी राज्यभरातील सर्व तक्रारींची चौकशी एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विशेष तपास पथक (SIT) गठित करण्यात आले असून नागपूर झोन २ चे पोलिस उपायुक्त नित्यानंद झा यांच्याकडे या पथकाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शिक्षक भरती घोटाळ्याचे गुन्हे तपासले जाणार आहेत.

