(मुंबई)
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा (तालुका रत्नागिरी) यांच्या वतीने मुंबईतील परळ येथे “जमिनीचा ७/१२ उतारा आणि कुळ कायदा” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत कुणबी ज्ञातिगृह वाघे हॉल, सेंट झेवियर स्ट्रीट, परेल येथे झालेल्या या कार्यक्रमाला तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲड. महेश आंबवले यांनी उपस्थितांना जमिनीचा ७/१२ उतारा, कुळ कायद्याचे विविध पैलू, भोगवटा, फेरफार, खोत पद्धत, डिजिटल नकाशे आणि जमिनीचे मूळ स्वामित्व यासंदर्भात सखोल आणि मुद्देसूद माहिती दिली. “जमीन आपली असूनसुद्धा तिचा सातबारा समजत नाही ही खंत अनेक शेतकऱ्यांच्या मनात आहे, आणि ही अडचण दूर करणे हेच माझे ध्येय आहे,” असे सांगून त्यांनी शंका-निरसन सत्रातही सहभाग घेतला.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुकुंद नवले यांनी केली, तर अध्यक्षस्थानी सूर्यकांत कृष्णा गोताड हे होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अनिल अवेरे यांनी पार पाडले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रश्नोत्तर सत्रात सहभागी नागरिकांनी आपले वैयक्तिक प्रश्न मांडून अधिक माहिती मिळवली. जमिनीविषयक अडचणी, फेरफार प्रक्रिया, तांत्रिक बाबी अशा विविध मुद्द्यांवर संवाद घडला. यावेळी अनेकांनी “असा उपयुक्त मार्गदर्शन कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यात गावपातळीवरही व्हावा” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यक्रमाची सांगता हरीश रेवाळे यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.