( मुंबई )
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यवसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) 14 ते 16 जुलैदरम्यान मुंबईत मोठी धडक कारवाई केली. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डेअरी, दूध विक्रेते आणि किरकोळ व्यावसायिकांवर टाकलेल्या धाडीत पारशी डेअरी फार्मचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. तसेच दुधाच्या पिशव्यांमध्ये फेरफार करून विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान भेसळयुक्त दूध, बनावट पनीर, चीज तसेच प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचाही मोठा साठा जप्त करण्यात आला. या काळात, FDA ने राज्यभरात तब्बल ₹1.9 कोटींहून अधिक किमतीचा माल जप्त केला. यामध्ये 2,317 लिटर दूध आणि सुमारे 6,850 किलो विविध दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे, ज्यांचे अंदाजे मूल्य ₹45.78 लाख आहे.
मरीन लाईन्स येथील पारशी डेअरी फार्म प्रा. लि. येथे FDA अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत उत्पादन विभागात गंभीर त्रुटी आढळून आल्या. उत्पादन विभागात अस्वच्छता, भिंतींवर बुरशी, माशांचा वावर, कीटक प्रतिबंधक जाळ्यांचा अभाव तसेच अनेक उत्पादनांवर ‘Best Before’ ची माहिती नसल्याचे निदर्शनास आले. ग्राहकांच्या आरोग्यासाठी या त्रुटी धोकादायक असल्याचे लक्षात घेऊन डेअरीचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. या आदेशानुसार, कंपनीला आता पुढील सूचना मिळेपर्यंत कोणत्याही अन्न उत्पादनांची निर्मिती, साठवणूक, वितरण किंवा विक्री करण्यास सक्त मनाई आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे (Food Safety and Standards Act) उल्लंघन केल्याचे तपासणीत समोर आले आहे.
दरम्यान, बुधवारी पहाटे FDA आणि गुन्हे शाखेच्या युनिट-11 ने गोरेगाव (पश्चिम) येथे संयुक्त कारवाई करत दुधाच्या पिशव्या उघडून त्यामध्ये फेरफार करून दूध विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांना अटक केली. या कारवाईत 822 दुधाच्या पिशव्यांमधील 558 लिटर दूध जप्त करून नष्ट करण्यात आले. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवंडी येथील मेसर्स सूफी डेअरी येथे केलेल्या तपासणीत पाश्चराईज्ड म्हशीचे दूध नियमानुसार सीलबंद पॅकेजिंगऐवजी उघड्या भांड्यांमधून विकले जात असल्याचे आढळले. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे FDA ने 1,683 लिटर दूध जागेवरच नष्ट केले आणि संबंधित डेअरीला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली.
याच मोहिमेदरम्यान मुलुंड येथील मेसर्स अग्रवाल एंटरप्रायझेस येथे टाकलेल्या धाडीत 61.25 किलो चीज आणि बनावट असल्याचा संशय असलेले पनीर जप्त करण्यात आले. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
मालाडमधील एका किरकोळ विक्रेत्याकडून सुमारे 1.27 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधितांकडून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, भेसळयुक्त किंवा बनावट अन्नपदार्थांबाबत नागरिकांना थेट तक्रार नोंदवता यावी यासाठी FDA ने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘Food & Drug Grievance Portal’ सुरू केले आहे. या पोर्टलवर नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत टाइप करून किंवा थेट आवाजाद्वारे तक्रार नोंदवू शकतात. संशयास्पद अन्नपदार्थांची माहिती नागरिकांनी त्वरित प्रशासनाला देण्याचे आवाहन FDA कडून करण्यात आले आहे.

