(मुंबई)
गेल्या तब्बल 16 वर्षांपासून रखडलेले Mumbai–Goa National Highway 66 (NH-66) प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला असला तरी त्याच्या प्रचंड विलंबाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतका उशीर झालेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन आपण करणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
मुंबई ते गोवा दरम्यानचा हा महामार्ग कोकणातील सर्वात महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग मानला जातो. मात्र मागील अनेक वर्षांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सव, शिमगोत्सव आणि इतर सणासुदीच्या काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांना खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या धोक्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या महामार्गाच्या कामाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत होते.
95 टक्के काम पूर्ण
दरम्यान, या महामार्गाचे सुमारे 95 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितीन गडकरी म्हणाले की, “हा प्रकल्प खूप जुना आहे आणि त्याच्या कामाला प्रचंड विलंब झाला आहे. त्यामुळे या महामार्गाचे उद्घाटन करण्यास मला संकोच वाटतो. इतका उशीर झालेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करणे योग्य वाटत नाही.”
पुढील महिन्यात गडकरींची पाहणी
गडकरी यांनी पुढील महिन्यात स्वतः मुंबई ते गोवा दरम्यान या महामार्गावरून प्रवास करून प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे सांगितले. या पाहणीनंतर उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या जातील. विशेष म्हणजे, समृद्धी महामार्ग सारखा मोठा प्रकल्प अल्पावधीत पूर्ण झाला. मात्र त्याच काळात मुंबई-गोवा महामार्गाचे काम दीर्घकाळ रखडल्याने कोकणातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
आता उर्वरित काम लवकर पूर्ण होऊन हा महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू व्हावा, अशी अपेक्षा कोकणातील नागरिक व्यक्त करत आहेत. हा महामार्ग पूर्ण झाल्यास मुंबई-गोवा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.

