(शिर्डी)
दिवाळीच्या प्रकाशमय वातावरणात शिर्डीत श्रद्धा आणि वैभवाचा संगम घडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त साईबाबा समाधी मंदिरात लक्ष्मीपूजनाचा थाटमाट पाहायला मिळाला. मंगळवारी सायंकाळी साई संस्थानच्या वतीने साईबाबांच्या मूर्तीला तब्बल पाच कोटी रुपये किंमतीची सुवर्ण आणि हिरेजडीत आभूषणे चढवण्यात आली.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते सायंकाळी 5 ते 5.55 या वेळेत गाभाऱ्यात लक्ष्मीपूजन पार पडले. या सोहळ्यात श्रीगणेश पूजन, लक्ष्मी-कुबेर पूजन, सरस्वती पूजन तसेच साईबाबांना धूप आणि नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी संस्थानचे अधिकारी, शिर्डी ग्रामस्थ आणि देशभरातून आलेले हजारो साईभक्त उपस्थित होते. लक्ष्मी-कुबेर पूजनानंतर सायंकाळी 6 वाजता श्रींची धुपारती झाली आणि त्यानंतर साईभक्तांसाठी दर्शन रांगा खुल्या करण्यात आल्या.
दिवाळीनिमित्त साई मंदिर परिसर विद्युत रोषणाईने झगमगत होता. समाधी मंदिराच्या सभोवती आणि लेंडीबाग परिसरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. या दिवशी द्वारकामाईत साईबाबांनी दिवे पेटवण्यासाठी तेलाऐवजी पाणी वापरल्याची प्रसिद्ध अख्यायिका आजही भाविकांच्या श्रद्धेने जिवंत आहे. त्यामुळे आजही हजारो साईभक्त द्वारकामाईत आणि लेंडीबागेत दिवे लावून त्या चमत्कारिक प्रसंगाची आठवण जागवतात.
साईंच्या दरबारातील लक्ष्मीपूजनाचा थाट काही औरच असतो. पूजेसाठी वापरली जाणारी भांडी, ताट, पंचारती, घंटा, समई, निरंजन, पळी, पंचपात्र आणि पाट – हे सर्व सोन्याचे असतात. यंदाही बाबांच्या मूर्तीला रत्नजडित सुवर्णहार, सोन्याच्या मुकुटासह पाच कोटी रुपयांच्या किंमतीची दागदागिने चढवण्यात आले. शंभर किलो सोन्याने मढवलेले साईबाबांचे सिंहासन आणि मंदिरावरचा सुवर्णकळस बाबांच्या दरबारातील वैभवाचे प्रतीक ठरतात.
शिर्डीत या सणाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी असते. साईभक्तांच्या व्यवस्थेसाठी सुमारे साडेसहा हजार कर्मचारी आणि अधिकारी तैनात आहेत. शिर्डीतल्या वाहनचालक, लॉजमालक, व्यापारी आणि मजूर अशा एक लाखाहून अधिक कुटुंबांना बाबांच्या कृपेने या उत्सवातून रोजगार आणि लक्ष्मी मिळते. दिवाळीच्या दिवशी अनेक भाविक आपल्या घरातील लक्ष्मीपूजनात साईबाबांचा फोटो ठेवतात, तर काही लेंडीबागेत कुटुंबासह प्रत्यक्ष पूजन करतात.
फकीराचं जीवन जगणाऱ्या साईबाबांना भक्त आज सोन्या-चांदीनं मढवतात. साईंना आज सोन्याचं ताट असलं तरीही साईबाबांचा संध्याकाळचा नैवेद्य हा पिठलं-भाकर-कांदा असाच असतो. हीच साईंच्या साधेपणाची आणि भक्तांच्या प्रेमाची साक्ष आहे.
साईंच्या दरबारात नेहमीच रिद्धी-सिद्धी नांदते, असा भाविकांचा विश्वास आहे. या श्रद्धेने अनेक भाविक पूजनावेळी आपले पैशांचे पाकीट साईंच्या चरणी ठेवतात. पूजेनंतर ते पाकीट त्यांना परत देण्यात येते, आणि भाविक या क्षणाला जीवनातील खऱ्या लक्ष्मीप्राप्तीचे प्रतीक मानतात. दिवाळीच्या या मंगल सोहळ्यात साई मंदिरात सुवर्णतेजाने उजळलेले वातावरण, भक्तांच्या ओठांवरील “साई राम”च्या गजराने भारलेले आकाश आणि दिव्यांनी नटलेली द्वारकामाई – या सर्वांनी शिर्डी पुन्हा एकदा श्रद्धा, भक्ती आणि वैभवाने उजळून निघाली.

