(रत्नागिरी / वार्ताहर)
केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे. कोणताही पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने काटेकोर खबरदारी घ्यावी. तसेच सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून विकासकामांना गती द्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज झालेल्या ‘दिशा’ समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सह-अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
दिव्यांगांसाठी ‘दिव्याशा केंद्र’ उभारण्याच्या सूचना
‘पंतप्रधान दिव्याशा वयोश्री योजने’ अंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळावा यासाठी जिल्हास्तरावर ‘दिव्याशा केंद्र’ सुरू करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
रेल्वे, पुनर्वसन आणि पायाभूत सुविधांवर भर
कोकण रेल्वे परिसरातील आवश्यक सुविधा आणि प्रलंबित कामांचा आढावा घेऊन आवश्यक निधीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. तसेच पोयनार धरण पुनर्वसन प्रकरणाचा जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आढावा घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर
गावठाणातील ग्रामपंचायत कार्यालयांची प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासह जलजीवन मिशन अंतर्गत सुधारित प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच प्रत्येक आर्थिक वर्षात मंजूर झालेला निधी त्याच वर्षात खर्च होईल, याकडे विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय
कृषी यांत्रिकीकरण योजनेची सोडत तातडीने काढावी, तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर हा विषय घेण्याचे निर्देश खासदार तटकरे यांनी दिले.
बीएसएनएल टॉवरची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा
जिल्ह्यातील बीएसएनएल टॉवरच्या कामांचा आढावा घेत, प्रगतीपथावर असलेल्या २० नवीन टॉवर्सचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले.
खासदार नारायण राणे यांचे रखडलेल्या कामांवर लक्ष
सह-अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी विविध विकासकामांचा आढावा घेत आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडाची संरक्षक भिंत आणि पायऱ्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील अपूर्ण कामांना गती द्यावी, पीक विमा प्रस्ताव नामंजूर झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेतील एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घेऊन सर्व अर्ज पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
अचूक आकडेवारीसह अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
बैठकीतील सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सर्व विभागांनी विकासकामांचे अहवाल टक्केवारी, अचूक आकडेवारी, आवश्यक निधी आणि काम पूर्ण होण्याची संभाव्य मुदत नमूद करून सादर करावेत, असे स्पष्ट सांगितले.
बैठकीत राष्ट्रीय कृषी विकास योजना, स्वामित्व योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत डिजिटल अभियान यांसह विविध महत्त्वाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीच्या प्रारंभी प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे (PPT) जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला.

