(मुंबई)
प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करण्यासाठी पैशांची गरज असल्याने एका महिलेने स्वतःच्या घरातच चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उर्मिला रमेश हलदिवे (राहणार गोरेगाव, संतोषनगर) हिला पोलिसांनी अटक केली आहे. चोरीतील सर्व मुद्देमाल पोलिसांनी तिच्याकडून आणि तिच्या प्रियकराकडून जप्त केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी दिली.
मनपाच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत रमेश धोंडू हलदिवे हे आपल्या पत्नी उर्मिला व तीन मुलांसह संतोषनगर येथील मनपा वसाहतीत राहतात. २६ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी झालेल्या चोरीत तीन लाख तीस हजारांचे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल कपाटातून गायब झाला होता. या प्रकरणी रमेश हलदिवे यांनी दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
तपासात उघडकीस आलेले वास्तव
तपासादरम्यान पोलिसांना उर्मिलाच्या जबाबांमध्ये विसंगती आढळली. तसेच ती परिसरातील एका तरुणाशी सतत संपर्कात असल्याचे समोर आले. संशयाच्या आधारे चौकशी केली असता तिनेच घरात चोरी केल्याची कबुली दिली. सोन्याचे दागिने तिने आपल्या प्रियकराकडे ठेवले असल्याची माहितीही दिली. पोलिसांनी तेथून सर्व मुद्देमाल जप्त केला.
उर्मिला आणि तिचा प्रियकर पळून जाऊन लग्न करण्याच्या विचारात होते. त्यासाठी पैशांची गरज असल्यानेच तिने चोरीचा कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाले. मात्र या गुन्ह्यात प्रियकराचा थेट सहभाग आढळून आला नाही. त्यामुळे त्याची जबानी नोंदवून त्याला सोडण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या उर्मिलाला बोरिवली येथील स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पत्नीनेच घरातील चोरी केली असल्याचे उघड झाल्याने संतोषनगर परिसरातील रहिवाशांना धक्का बसला आहे.

