(पुणे)
सोशल मीडियावरून अनोळखी व्यक्तींशी वाढणाऱ्या ओळखींचा गैरफायदा घेत हनी-ट्रॅपच्या घटना वाढत आहेत. पुण्यातील एका 28 वर्षीय तरुणाला इंस्टाग्रामवर झालेली ओळख महागात पडली. विश्वास संपादन करून एका तरुणीने त्याला कात्रज घाटात फिरायला बोलावले आणि तेथे पोहोचताच तिच्या साथीदारांच्या मदतीने तरुणाला धमकावून लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तरुणीसह चार ते पाच जणांविरुद्ध लूट, धमकी आणि खंडणीसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसा रचला हनी-ट्रॅपचा डाव?
पोलीसांच्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण भूगाव परिसरात राहतो. इंस्टाग्रामवर एका तरुणीशी त्याची मैत्री झाली होती. ऑनलाईन गप्पा वाढत गेल्यानंतर तरुणीने त्याचा विश्वास संपादन केला. 7 डिसेंबर रोजी तिने त्याला फोन करून कात्रज घाटात भेटायला बोलावले. तरुण दुचाकीने घाटात पोहोचताच काही वेळाने तरुणीही त्याच्यासोबत बसून निघाली. मात्र पुढे अंधाऱ्या ठिकाणी तिचे साथीदार आधीच लपून बसले होते. त्यांनी दुचाकी अडवून तरुणाला धमकावले आणि येवलेवाडी परिसरात नेण्यास भाग पाडले.
मारहाण, धमकी आणि खंडणीची मागणी
येवलेवाडी येथे तरुणाला मारहाण करण्यात आली. बलात्कार तसेच पोक्सो गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तरुणीने त्याच्याकडून 70 हजार रुपये मागितले. त्याच्याकडे एवढी रक्कम नसल्याने त्याच्याकडून 10 हजार रुपये जबरदस्तीने घेतले आणि उर्वरित रक्कम देण्यासाठी दबाव आणला. या धमक्यांमुळे घाबरलेला तरुणाने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. सध्या तरुणी आणि तिचे साथीदार फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात करत आहेत.

