( मुंबई )
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांना डॉक्टर पत्नीच्या आत्महत्याप्रकरणी सोमवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे (२८) यांनी शनिवारी रात्री वरळी येथील निवासस्थानी आत्महत्या केली होती. अनंत गर्जे यांच्यासोबत सतत होणाऱ्या वादांमुळे गौरी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. गौरी यांच्या वडिलांनीही पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी अनंत गर्जे, त्यांची बहीण आणि भाऊ यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. अनंत गर्जे यांना सोमवारी अटक करून वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलिसांनी न्यायालयास सांगितले की, इतर आरोपी फरार आहेत. गौरी यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, म्हणून तपासासाठी गर्जे यांची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी युक्तिवाद केला. तर गर्जे यांच्या बाजूने, ते तपासात सहकार्य करत असून जप्त करण्यासारखे काही नाही, अशी भूमिका मांडण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अनंत गर्जे यांना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

