(पुणे)
पिंपरी-चिंचवडमधील चौवीसवाडी परिसरात गुरुवारी संध्याकाळी भीषण दुर्घटना घडली. राम स्मृती सोसायटीतील लिफ्टमध्ये अडकून अवघ्या १२ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोसायटीत शोककळा पसरली आहे. अमेय फडतरे असे या मुलाचे नाव आहे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये गेला असता, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या दरम्यान लिफ्ट अचानक अडकली. जुन्या पद्धतीच्या लोखंडी पट्ट्यांच्या दारातून खेळताना त्याचा पाय बाहेर सरकल्याने लिफ्ट अडकून बसली. यात तो फसला आणि दरवाजा उघडत नसल्याने श्वास गुदमरू लागला. सुटकेसाठी त्याने वारंवार आक्रोश केला. मोठा आवाज ऐकून रहिवाशी धावले, पालकांनाही बोलावण्यात आले आणि सुटकेचे प्रयत्न सुरू झाले. मात्र सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले.
दरम्यान, माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कटरच्या साहाय्याने लिफ्ट उघडून मुलाला बाहेर काढण्यात आले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर सोसायटीत शोककळा पसरली असून रहिवाशांनी लिफ्टच्या देखभालीतील निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

