( राजापूर )
“जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव हिंदूंचा देश आहे. जगाला जोडण्याची क्षमता केवळ हिंदू धर्मात आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून, हा विचार आजच्या तरुण पिढीत रुजला पाहिजे. जातीपाती आणि वाईट चालीरीतींचा अंत करून हिंदू समाज एकजूट झाला, तरच देश खऱ्या अर्थाने टिकेल आणि समृद्ध होईल,” असे परखड मत अभिनेते व सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
नगर वाचनालय, राजापूरच्या वतीने आयोजित “स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. सुमारे दोन तास त्यांनी स्वा. सावरकरांच्या जीवनचरित्राचे विविध पैलू उलगडत विचारांचे स्फुलिंग चेतविले.
पोंक्षे म्हणाले, “भारत स्वतंत्र झाल्यानंतर सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ व राष्ट्रहितकारी विचारांना तिलांजली दिली गेली. सावरकरांचा तरुणांचे सैनिकीकरण, जातीभेदाचे उच्चाटन, लोकशाहीची पायाभरणी आणि एकसंघ समाज उभारणीचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. हिंदू समाज एकत्र आला नाही, तोपर्यंत बहुसंख्यांचा विचार कोणीही करणार नाही. धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “सावरकरांनी जातीभेदाची भिंत मोडून पतीतपावन मंदिराची निर्मिती केली, पाचशे विहिरी अस्पृशांसाठी खुल्या केल्या. 1924 ते 1937 या काळात त्यांनी केलेले जातिनिर्मूलनाचे काम विसरता कामा नये. जो राष्ट्राचा इतिहास विसरतो, त्याचा भूगोल बिघडतो. म्हणून खरी इतिहासदृष्टी पुढील पिढीकडे पोहोचवली पाहिजे.”
छत्रपती शिवरायांना गुरुस्थानी मानून सावरकरांनी युद्धनीती व मुत्सद्देगिरीचा अवलंब केला होता. चातुर्वर्ण व्यवस्था, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील हिंदू समाजस्थिती, तसेच माफीनाम्यावरील आरोपांची वस्तुस्थिती यांवरही पोंक्षे यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत अभ्यंकर यांनी केले. अध्यक्ष प्रभात पाध्ये यांनी पोंक्षे यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ. पद्मजा कारेकर यांनी केले, तर आभार लोचनी साळवी यांनी मानले. कार्यक्रमाला सावरकरप्रेमी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

