(राजापूर)
राजापूर तालुक्यातील आजिवली गावात शिवगर्जना मित्र मंडळाकडून शिवजन्मोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यंदाचे वर्ष मंडळासाठी विशेष आनंदाचे ठरणार असून एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव तर दुसरीकडे मंडळाच्या यशस्वी वाटचालीची दहा वर्षे पूर्ण होत आहेत.
शिवगर्जना मित्र मंडळाने गेल्या दहा वर्षांत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वारकरी परंपरेचा वारसा जपणारे हे मंडळ शिवरायांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन जीवनात रुजवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. काही मुठभर तरुणांनी पाहिलेले स्वप्न आज संपूर्ण गावाच्या सहकार्याने साकार झाले असून याचा अभिमान प्रत्येक ग्रामस्थाला वाटतो.
या दुहेरी आनंदाच्या निमित्ताने गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा केवळ उत्सव न राहता गावासाठी एक सण ठरावा, या उद्देशाने विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा
सकाळी ८.००: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन
सकाळी ८.३०: गावातील मुलांची शिवरायांवरील भाषणे
सकाळी ९.००: भव्य वाहन रॅली (श्री रामसेवक मित्र मंडळ, पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने)
दुपारी २.०० ते ५.००: गावातील महिलांचा हळदी-कुंकू समारंभ
सायंकाळी ५.०० ते ७.००: संयुक्त वारकरी भजन
सायंकाळी ७.०० ते ९.००: वारकरी सांप्रदाय आजिवली, आदिनाथ भागवत सांप्रदाय ताम्हाणे आणि परिसरातील सर्व वारकरी मंडळींचा सामुदायिक हरिपाठ
या विविध कार्यक्रमांनी नटलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यास सन्माननीय पाहुणे, आजिवली गावातील सर्व ग्रामस्थ तसेच परिसरातील तमाम शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शिवगर्जना मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

