(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोंडगाव (साखरपा) येथील थोर समाजसेवक कै. नानासाहेब शेट्ये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा कै. नानासाहेब शेट्ये स्मृती व्यक्ती व संस्था पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा व्यक्ती पुरस्कार लांजा तालुक्यातील कोट येथील ज्येष्ठ समाजसेवक, माजी सरपंच तथा गावाच्या विकासाचे शिल्पकार शांताराम आत्माराम (आबा) सुर्वे यांना, तर संस्था पुरस्कार श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती ग्रामविकास संघ, कुंभाड (मुंबई) या संस्थेला जाहीर झाला आहे.
पुरस्कारांसाठी वर्तमानपत्रे व सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची छाननी करून संस्थेने नियुक्त केलेल्या निवड समितीने एकमताने पुरस्कारार्थींची निवड केली.
शांताराम (आबा) सुर्वे यांनी समाजकारण, ग्रामविकास आणि लोकसेवेत दिलेल्या निःस्वार्थ योगदानाची दखल घेत त्यांची व्यक्ती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे आबा सुर्वे हे सर्वसामान्यांचे आधारवड मानले जातात.
संस्था पुरस्कारासाठी निवड झालेली श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती ग्रामविकास संघ, कुंभाड ही संस्था अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, सामाजिक उपक्रम आणि विकासकामांसाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेने स्वमालकीच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारून शिवस्मारक साकारले आहे. तसेच युवक-युवतींना मार्गदर्शन, क्रीडा विकासासाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्याचे काम सुरू असून, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव आणि वार्षिक मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्याचे कार्यही संस्था करत आहे.
यावर्षीच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष संदेश (बापूसाहेब) शेट्ये, सरचिटणीस संतोष केसरकर, ग्रामीण समितीचे अध्यक्ष दत्ताराम शिंदे, कार्याध्यक्ष गणपत शिर्के, चिटणीस रमाकांत शिंदे, खजिनदार मारुती शिंदे, रमाकांत शेट्ये तसेच सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.
या पुरस्कारांचे वितरण १ ऑगस्ट २०२६ रोजी कै. नानासाहेब शेट्ये यांच्या स्मृतिदिनी नाना शेट्ये सभागृह, साखरपा येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
फोटो : शांताराम आत्माराम (आबा) सुर्वे.

