(राजापूर)
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील पन्हळे (ता. सौंदळ) येथे मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा आणि ट्रकसह एकूण ₹2 कोटी 36 लाख 72 हजार 280 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या मद्य वाहतूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
ट्रक कंटेनरमधून अवैध मद्य वाहतूक
राज्य उत्पादन शुल्क विभाग, भरारी पथक यांना गोवा बनावटीच्या विदेशी दारूची अवैध वाहतूक केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे 1 सप्टेंबर रोजी पन्हळे तर्फे सौंदळ येथील निनादेवी मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला. त्यावेळी टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक कंटेनर (क्र. RJ-14-GK-9464) तपासणीसाठी थांबवण्यात आला. त्यात 1866 बॉक्स गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा साठा आढळून आला. मद्यसाठ्याबरोबरच ट्रक मिळून एकूण ₹2,36,72,280 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हा दाखल
या प्रकरणी कंटेनर चालक आसिफ आस मोहम्मद याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(अ), 65(इ), 81, 83 आणि 90 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक एस.आर. गायकवाड करत असून, अमोल चौगुले हे फिर्यादी आहेत. ही संपूर्ण कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, उप अधीक्षक रवींद्र उगले, तसेच निरीक्षक रियाज खान आणि विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत निरीक्षक अमित पडळकर, दुय्यम निरीक्षक एस.एस. गोंदकर, जवान चंदन पंडीत, निलेश तुपे, मलिक धोत्रे आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, रत्नागिरी यांच्या सहकार्याने पार पडली.
कारवाई दरम्यान जप्त केलेला परराज्यातून आणलेला मोठ्या प्रमाणातील मद्यसाठा पाहता, यात आंतरराज्य गुन्हेगारी टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अवैध दारू निर्मिती, विक्री वा वाहतुकीविषयी कोणतीही माहिती असल्यास, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल-फ्री क्रमांक 1800-833-3333 किंवा 022-22663881 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

