(खेड)
तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा गंडाळा उफाळून आला आहे. ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वाहनांना अडवून कागदपत्रांची पाहणी करताना वाद निर्माण झाला आणि त्यातून थेट मारहाण व जीवे मारण्याच्या धमकीपर्यंत प्रकरण गेले. ही घटना ८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९.०० ते ९.२० च्या सुमारास हिंदुस्थान कोकाकोला कंपनी, लोटे एमआयडीसी गेटबाहेरील रस्त्यावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजयकुमार सुरेंद्र बहादूर सिंग (वय ४२, सध्या रा. दाभीळ, खेड, मूळ रा. आमेठी, उत्तरप्रदेश) हे घरी जेवत असताना आरोपी संजय बुरटे (रा. असगणी, ता. खेड) याने फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर कास्ट सुलोसनीम ट्रान्सपोर्ट प्रा. लि. या कंपनीच्या गाड्या संजय बुरटे व त्याच्यासोबत आलेल्या १० ते १२ अनोळखी व्यक्तींनी अडवून ठेवत त्यांची कागदपत्रे तपासली.
या दरम्यान फिर्यादी घटनास्थळी पोहोचले असता उपस्थित आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. त्यातील एका अनोळखी इसमाने फिर्यादींच्या पाठीवर हाताने मारहाण केली. एवढेच नव्हे तर, “इथे पुन्हा दिसलास तर हातपाय तोडून टाकू” अशी थेट धमकीही दिली. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५१(२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

