(राजापूर / प्रतिनिधी)
तालुक्यातील वडवली बौद्धवाडी येथील बौद्धविहारात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून पितळ, तांबे व स्टीलची भांडी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीस गेलेल्या ऐवजाची किंमत सुमारे ८ हजार ८८० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बौद्धविहाराची साफसफाई करून तेथील तांब्या-पितळ व स्टीलची भांडी स्वच्छ करून व्यवस्थित ठेवण्यात आली होती. त्यानंतर बौद्धविहारास कुलूप लावण्यात आले होते. दि. २ मार्च २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी गौतम विश्राम जाधव (वय ४५, रा. वडवली बौद्धवाडी, ता. राजापूर; सध्या रा. मिरजोळे, ता. जि. रत्नागिरी) तसेच स्थानिक सार्वजनिक मंडळाचे सदस्य साफसफाईसाठी गेले असता दरवाज्याचा कोयंडा तुटलेला दिसला. आत पाहणी केली असता पितळ, तांबे व स्टीलची भांडी चोरीस गेल्याचे उघड झाले.
चोरीस गेलेल्या ऐवजात अंदाजे २५ किलो वजनाची जुनी पितळेची पाण्याची टाकी (किंमत सुमारे २,००० रुपये), १५ किलो वजनाचे तांब्याचे पातेले (१,२०० रुपये), ५० किलो वजनाचे मोठे तांब्याचे पातेले (४,००० रुपये), ४० स्टीलची ताटे व २० स्टीलचे ग्लास (१,६०० रुपये) तसेच पितळेचे कुलूप (८० रुपये) यांचा समावेश आहे.
अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१ (३), ३३१ (४) व ३०५ (अ) अन्वये गुन्हा क्रमांक ४५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. दि. २८ फेब्रुवारी २०२६ ते २ मार्च २०२६ या कालावधीत ही चोरी घडल्याचा अंदाज असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
गावोगावी धार्मिक स्थळांवर डोळा ठेवत चोरट्यांनी आता आपला मोर्चा मंदिर आणि बौद्धविहारांकडे वळवला असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. कुलपे तोडून पितळ, तांबे, स्टीलची भांडी आणि इतर पूजाविधीतील साहित्य लंपास करण्याच्या घटना वाढत आहेत. धार्मिक स्थळात घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरात अस्वस्थता निर्माण झाली असून, चोरट्यांचा लवकरात लवकर माग काढण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

