(रत्नागिरी / वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्गावरील उन्हाळे ता. राजापूर येथे बुधवार १७ जून रोजी संध्याकाळी एका हृदयस्पर्शी आणि तितक्याच चिंताजनक घटनेने प्रवाशांचे लक्ष वेधले. एका पाळीव गाईने रस्त्यावरच वासराला जन्म दिल्याची घटना घडली. रस्त्यावरील अनियंत्रित परिस्थिती आणि गाभण जनावरांना रस्त्यावर सोडण्याच्या प्रकारामुळे जनावरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित गाय गाभण अवस्थेत असताना रस्त्याच्या कडेला, महामार्ग परिसरात मोकळी सोडण्यात आली होती. आज सकाळी अचानक प्रसूती सुरू झाल्याने गाईने थेट महामार्गावरच वासराला जन्म दिला. यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेनंतर जनावरांच्या मालकांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. गाभण जनावरे अशा प्रकारे उघड्यावर सोडल्यामुळे अपघाताचा आणि प्राणहानीचा गंभीर धोका निर्माण होतो.
या घटनेदरम्यान महामार्गावरून जाणारे श्री. मैत्रेय नाफडे (राहणार कशेळी ता. राजापूर) या जागरूक प्रवाशाने तत्परता दाखवत पुढाकार घेतला. त्यांनी तातडीने गाई आणि नवजात वासराला तातडीची मदत करून रस्त्याच्या धोकादायक भागातून सुरक्षित स्थळी हलवले. त्यांच्या या जबाबदार वागणुकीमुळे मोठा अनर्थ टळला असून आई आणि वासरू दोघेही सुरक्षित झाले आहेत.
या प्रकाराबाबत उपस्थित प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. गाभण पाळीव जनावरे रस्त्यावर किंवा मोकळ्या सोडणे हे अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा घटनांमुळे जनावरांना गंभीर दुखापत होण्याची किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या घटनेनंतर जनावरांच्या मालकांसाठी त्यांनी आवाहन केले आहे की, गाभण किंवा आजारी जनावरे रस्त्यावर मोकळी सोडू नयेत. योग्य काळजी आणि सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करणे ही मालकांची जबाबदारी असल्याचेही अधोरेखित करण्यात आले आहे.
ही घटना पुन्हा एकदा रस्त्यावरील जनावरांच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित करणारी ठरली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक जागरूकता आणि जबाबदारीची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने याबाबत कठोर पावले उचलावीत आणि निष्काळजीपणे जनावरे सोडणाऱ्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.

