(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रेल्वेमार्गावर दुर्दैवी घटना घडली आहे. भोके रेल्वे स्टेशन परिसरातील करबुडे बोगद्यात एक अनोळखी पुरुष गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, भोके रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर यांनी रेल्वे पोलिसांना फोनद्वारे कळविले की, उक्शी स्टेशन ते भोके स्टेशन मास नं. ५०५२, कि.मी. नं. १९३/७-८ या दरम्यानच्या बोगद्यात एक इसम जखमी अवस्थेत पडलेला आहे. त्यानुसार पोलीस हवालदार पांडुरंग बापु वरुटे (वय ४४, रत्नागिरी लोहमार्ग रेल्वे पोलीस) यांना घटनास्थळी पाठविण्यात आले. पाहणी दरम्यान अंदाजे ३५ वर्षांचा अनोळखी पुरुष गंभीर जखमी अवस्थेत दिसून आला. त्याच्या डोक्यापासून डाव्या डोळ्यापर्यंत गंभीर दुखापत झालेली होती.
प्राथमिक अंदाजानुसार, तो कोणत्यातरी रेल्वेतून पडल्याने जखमी झाल्याचे समजते. जखमी इसमाला तातडीने १०८ ॲम्ब्युलन्सद्वारे सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, बी.एन.एस.एस. १९४ अन्वये रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

