(रत्नागिरी /प्रतिनिधी )
वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालला आहे. मुख्य आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांनाही पोलिसांनी आता गजाआड केले आहे. जयगड पोलिसांनी दर्शन पाटील (रा. वाटद-खंडाळा, रत्नागिरी) यांना अटक केली असून, राकेश जंगम खून प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
राकेश जंगम हा दुर्वासच्या सायली बारमध्ये वेटर म्हणून कार्यरत होता. ६ जून २०२४ रोजी दुर्वास आणि त्याच्या साथीदारांनी राकेशचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह आंबाघाट परिसरात टाकून दिला. या घटनेनंतर बराच काळ कोणालाही याचा थांगपत्ता लागला नव्हता. अखेर २१ जून रोजी राकेशच्या आईने जयगड पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यान, मिरजोळेतील रहिवासी भक्ती मयेकरच्या खुनाचा तपास सुरू असताना दुर्वासने चौकशीत धक्कादायक कबुली दिली. त्याने स्वतः आणखी दोन खून केल्याचे उघडकीस आणले. त्यात राकेश जंगम आणि कळझोंडी येथील सीताराम वीर यांचा समावेश होता. या मालिकेत दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि निलेश भिंगार्डे यांना अटक झाली. यापैकी दुर्वास आणि विश्वास हे दोघे भक्ती मयेकर खून प्रकरणी शहर पोलिसांच्या कोठडीत असून, निलेश भिंगार्डे न्यायालयीन कोठडीत आहे.
या सर्व घटनाक्रमात आता दुर्वास पाटीलचे वडील दर्शन पाटीलही अटकेत आल्याने तिहेरी खून प्रकरणातील नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाभोवतीचा रहस्याचा पडदा अधिकच दाट झाला आहे.

