(लांजा)
तालुक्यातील आडवली-हसोळ परिसरात शनिवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात तब्बल १२ शेळ्यांचा बळी गेला. यात चार बोकड आणि आठ शेळ्या ठार झाल्याने शेतकऱ्यांचे जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
किशोर वसंत आग्रे (रा. आडवली) आणि सचिन अनंत कांबळे (रा. हसोळ) यांच्या मालकीच्या शेळ्या व बोकड एका गोठ्यात बांधलेले होते. शनिवारी, ६ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात घुसून हल्ला चढविला. त्यात चार बोकड व आठ शेळ्यांचा जागीच बळी गेला.
या घटनेची माहिती मात्र मालकांना तत्काळ मिळाली नव्हती. दुसऱ्या दिवशी, रविवारी दुपारी सचिन कांबळे गोठ्यातील शेळ्या चरायला सोडण्यासाठी गेले असता त्यांना संपूर्ण गोठा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. आत मृतावस्थेत पडलेल्या शेळ्या व बोकड पाहून त्यांचा थरकाप उडाला. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये बिबट्याच्या वावराबद्दल प्रचंड भीती पसरली असून, वनखात्याने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.

