(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गुहागर तालुक्यातील काताळे येथील बौद्ध स्मशानभूमीतील विहीर खोदकाम प्रकरणी सुरू असलेले बेमुदत उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले असले, तरी आंदोलनामागील सर्व मागण्या कायम असल्याची स्पष्ट भूमिका मजूर रिपब्लिकन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णा जाधव यांनी घेतली आहे. आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
गटविकास अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात अण्णा जाधव यांनी म्हटले आहे की, प्रशासनाने संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात येईल तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत विहिरीच्या ठिकाणी कोणतेही काम होणार नसल्याचे लेखी आश्वासन दिले आहे. या आश्वासनाची नोंद घेत उपोषणकर्त्यांनी बेमुदत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, यापूर्वी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच अन्य सक्षम प्राधिकरणांकडे सादर करण्यात आलेली सर्व निवेदने, त्यातील आक्षेप आणि मागण्या यथावत कायम असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे उपोषण स्थगित झाल्याचा अर्थ प्रकरण निकाली निघाल्याचा किंवा मागण्या मागे घेतल्याचा होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित विहिरीच्या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत झाल्याचा दावा पत्रात करण्यात आला असून, त्यासंदर्भातील छायाचित्रे उपलब्ध असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे चौकशीदरम्यान या बाबींचाही सखोल विचार करून संबंधित सर्वांची भूमिका निष्पक्षपणे तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने आणि कायदेशीर चौकटीत कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत, आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास किंवा वस्तुस्थितीच्या विरोधात कारवाई झाल्यास उपलब्ध सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब करत लोकशाही मार्गाने आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा अधिकार अबाधित राहील, असा इशारा अण्णा जाधव यांनी पत्राद्वारे दिला आहे. प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे आणि चौकशीच्या दिशेकडे आता संबंधित ग्रामस्थांसह उपोषणकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

