(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात गोवा बनावटीच्या तसेच बनावट (डुप्लिकेट) दारूची खुलेआम विक्री सुरू असताना प्रशासन नेमके करत काय आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करत अधिकृत मद्य परवानाधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या या आंदोलनाने प्रशासनाच्या भूमिकेवरच थेट प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात बेकायदेशीर दारूचा सुळसुळाट होत असताना ही दारू नेमकी येते कुठून आणि कोणाच्या आश्रयाने विकली जाते, असा रोखठोक प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत का, की या सगळ्यामागे कुठले संगनमत दडले आहे, असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. कर भरून कायदेशीर व्यवसाय करणारे परवानाधारक रस्त्यावर उतरून उपोषण करतात आणि अवैध धंदेवाले मात्र मोकाट फिरतात, ही स्थिती प्रशासनाच्या अपयशाची पावती नाही का, असा देखील संताप व्यक्त केला जात आहे. महसूल बुडत असताना आणि बनावट दारूमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असताना, प्रशासन कारवाईसाठी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा बोचरा सवालही आता उपस्थित केला जात आहे.
अवैध दारू विक्रीवर तात्काळ पूर्णविराम देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, हप्तेखोरीच्या चर्चांमुळे कारवाईला अडथळा येत आहे का आणि बुडणाऱ्या महसुलाची जबाबदारी कोण घेणार, या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. रत्नागिरीत सुरू झालेल्या या आमरण उपोषणामुळे प्रशासनाची कसोटी लागली असून, ठोस पावले उचलली जातात की केवळ आश्वासनांवरच हा प्रश्न थांबतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

