(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी-तरवळ-निवळी मुख्य मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः तरवळ आणि तिवराड परिसरातील वळणांवर पडलेले खोल खड्डे पावसाच्या पाण्याने भरल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
निवळी-तरवळ-करबुडे-जाकादेवी या महत्त्वाच्या मार्गावरून दररोज शेकडो लहान-मोठी वाहने आणि अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, त्याचा सर्वाधिक फटका दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि कारचालकांना बसत आहे.
काही दिवसांपूर्वी संबंधित विभागाने या खड्ड्यांमध्ये दगड आणि माती टाकून तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र, सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे ही दुरुस्ती वाहून गेली असून, खड्डे पुन्हा पूर्ववत झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहने घसरण्याच्या घटना वाढत आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालवणे म्हणजे मोठी कसरत ठरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात अपघाताचा धोका अधिक वाढतो. अनेक वाहनांचे नुकसानही या खड्ड्यांमुळे झाले असून, त्याची भरपाई कोण करणार, असा सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला आवाहन करताना सांगितले की, पावसाळ्यात कायमस्वरूपी डांबरीकरण शक्य नसले तरी मोठे खड्डे दगड, खडी आणि मातीच्या साहाय्याने तातडीने भरून वाहतूक सुरक्षित करावी. यामुळे अपघातांचा धोका कमी होऊन वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.
विशेष म्हणजे या मार्गावरून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी नियमित प्रवास करत असतानाही रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूक ही नागरिकांची मूलभूत गरज असताना या महत्त्वाच्या मार्गाकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पावसाळा सुरू असताना या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डेमुक्त करण्याची मागणी वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

