(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज (बुधवारी) ३३वा दिवस असून, सकाळपासूनच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि समर्थक आंदोलनस्थळी दाखल झाले. मुसळधार पावसाची पर्वा न करता आंदोलकांनी आंदोलन सुरू ठेवले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीवर आंदोलन कायम आहे.
दरम्यान, मंगळवारी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर राजधानीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात एकूण १० एफआयआर दाखल केले असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सीआरपीएफच्या २० अतिरिक्त तुकड्या कोलकात्यातून दिल्लीत बोलावण्यात आल्या आहेत.
हिंसाचारानंतर पोलिसांची कारवाई
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी पोलिसांवर आणि दंगल नियंत्रण पथकातील जवानांवर हल्ला केला. तसेच दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या घटनांप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.
चार पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद
या प्रकरणात संसद मार्ग पोलीस ठाण्यात चार, कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तीन, तर मंदिर मार्ग, बाराखंबा रोड आणि कर्तव्य पथ पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ क्लिप्स आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात असून, हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांवर हल्ल्याचा आरोप
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्री परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तैनात असलेल्या रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या जवानांवर काही उपद्रवी घटकांनी हल्ला केला. या घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यांचीही चौकशी सुरू आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनामुळे सुरक्षा वाढवली
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने आणि आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन जंतर-मंतर, संसद परिसर आणि इतर संवेदनशील भागात सीआरपीएफ, रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
यापूर्वीही दिल्ली पोलिसांच्या मदतीसाठी सीआरपीएफ आणि RAF च्या सुमारे ३० तुकड्या राजधानीत तैनात करण्यात आल्या होत्या. आता अतिरिक्त सुरक्षा दल दाखल झाल्याने राजधानीतील संवेदनशील ठिकाणांवरील सुरक्षा आणखी वाढविण्यात आली आहे.

