( मुंबई )
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया वरून निघणारी आयएएसव्ही त्रिवेणी ही नाव केवळ समुद्रावर तरंगणारी नौका नाही, तर भारतीय नारीशक्तीच्या स्वप्नांना मिळालेली अभूतपूर्व भरारी आहे. भारतीय सशस्त्र दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच सेना, नौदल आणि वायुदलातील दहा महिला अधिकारी या स्वदेशी नौकेवरून जगप्रदक्षिणेला निघाल्या आहेत. 26,000 नॉटिकल मैलांचा हा महासागरातील प्रवास भारतीय स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा जागर ठरणार आहे.
महासागरातील आव्हानात्मक प्रवास
हा प्रवास साधा सागरी प्रवास नसून विषुववृत्त दोनदा पार करणे, केप ल्यूविन, केप हॉर्न आणि केप ऑफ गुड होप या तीन अत्यंत कठीण समुद्रमार्गांना प्रदक्षिणा घालणे आणि ड्रेक पॅसेजसारख्या धोकादायक पाण्यातून मार्ग काढणे अशी मोठी आव्हाने या महिला अधिकारी स्वीकारणार आहेत. उद्या 11 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतून सुरू होणारा हा प्रवास नऊ महिन्यांचा असून, मे 2026 मध्ये ‘त्रिवेणी’ परत मुंबईत दाखल होईल. तेव्हा ती केवळ एक नौका नसेल, तर नारीशक्तीच्या विजयाची प्रतीक ठरेल, असा विश्वास कॅप्टन प्राजक्ता निकम यांनी व्यक्त केला.
कठोर प्रशिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा
गेल्या दोन-अडीच वर्षांत या अधिकाऱ्यांनी नौकानयन, नेव्हिगेशन, संवाद, स्कुबा डायव्हिंग, वैद्यकीय मदत अशा विविध कौशल्यांचे प्रशिक्षण घेतले. स्कॉड्रन लीडर वैशाली भंडारी यांनी सांगितले की, प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष 4000 नॉटिकल मैलांचा प्रवास केला. मुंबई-गोवा, मुंबई-कोचीन, मुंबई-लक्षद्वीप आणि मुंबई-सियाचेल अशा मार्गांवर प्रवास करत आणीबाणीच्या प्रसंगी घ्यायची काळजी आणि तत्काळ निर्णयक्षमता विकसित करण्यावर भर देण्यात आला.
जागतिक बंदरांना भेट
या प्रवासादरम्यान ऑस्ट्रेलियातील फ्रेमँटल, न्यूझीलंडमधील लिटलटन, अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्स आणि दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन या चार महत्त्वाच्या बंदरांना भेट देण्यात येईल. या प्रवासातून समुद्रातील जैवविविधता, पर्यावरण आणि स्थानिक संस्कृतीबाबतचा अनुभव वेळोवेळी भारतात शेअर करण्यात येणार असल्याचे या मोहिमेच्या लीडर लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर यांनी स्पष्ट केले.
टीम त्रिवेणी
- लीडर – लेफ्टनंट कर्नल अनुजा वरुडकर
- डेप्युटी लीडर – स्कॉड्रन लीडर श्रद्धा पी. राजू
- मेजर करमजीत कौर
- मेजर ओमीता दळवी
- मेजर डौली बुटोला
- कॅप्टन प्राजक्ता निकम
- लेफ्टनंट कमांडर प्रियांका गुसैन
- विंग कमांडर विभा सिंग
- स्कॉड्रन लीडर आरुवी जयदेव
- स्कॉड्रन लीडर वैशाली भंडारी
ही टीम जगाच्या महासागरांवरून भारताचा डंका वाजवेल आणि प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून येईल, असा विश्वास संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

