पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील सोहाना परिसरात सोमवारी रात्री आयोजित एका खासगी कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करत प्रसिद्ध कबड्डीपटू आणि प्रमोटर राणा बालचौरिया यांची निर्घृण हत्या केली.
या हल्ल्यात राणा बालचौरियाच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या वरच्या भागात चार ते पाच गोळ्या लागल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मोहालीचे पोलिस अधीक्षक हरमनदीप हंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी सेल्फी काढण्याच्या बहाण्याने राणा बालचौरियाला थांबवले. तो थांबताच त्यांनी अगदी जवळून गोळीबार केला. जवळून करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे त्याच्या बचावाची शक्यता अत्यंत कमी होती, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून घटनास्थळावरून फरार झाले.
या हत्येचा गायक सिद्धू मूसेवाला हत्येच्या बदल्याशी संबंध असू शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे. तसेच या प्रकरणामागे बंबीहा टोळीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी पोलिसांकडून यास अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवली असून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा आणि सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीचा तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे पंजाबमधील क्रीडा क्षेत्रात तसेच कबड्डी विश्वात तीव्र संताप आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे.

